दौंड-पुणे लोहमार्गावर ‘मेमू’ सेवा

Source: online4.esakal.com

Posted by: RKS on 09-06-2016 01:34, Type: Commentary/Human Interest , Zone: Central Railway)

दौंड - पुणे लोहमार्ग विद्युतीकरणानंतर मेनलाइन इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट (मेमू) सेवा सुरू करण्यासंबंधी विचार सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

‘मेमू’ ही विजेवर चालणारी प्रवासी गाडी असून, प्रामुख्याने एका शहराला दुसऱ्या शहराशी जोडण्यासाठी तिचा वापर केला जातो. या गाडीचा वेग पॅसेंजर गाडीपेक्षा अधिक म्हणजे ताशी १०५ किलोमीटर इतका आहे. ‘मेमू’ सेवेसाठी २५ हजार व्होल्ट अल्टरनेट करंटची आवश्‍यकता असते. ‘मेमू’च्या डब्यांचे बाह्य स्वरूप पॅसेंजर गाड्यांच्या डब्यासारखे आहे; परंतु पुणे - लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या डब्यांपेक्षा त्यांची रुंदी कमी आहे. मध्य रेल्वे प्रशासन ‘मेमू’ गाडी चालविण्यासंबंधी विचार करीत असून, रेल्वे बोर्डाकडे त्यासंबंधी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने पुणे येथे नुकतीच विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात दौंड - पुणे लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत वरील माहिती देण्यात आली. बैठकीस मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय, आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह प्रवीण शिंदे, अप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग आदी उपस्थित होते.

दरम्यान, खासदार सुळे यांनी ११ जुलै रोजी दौंड येथे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या व्यवस्थापकांसमवेत आढावा बैठक आयोजित केली आहे.